बीड
गुजर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजाच्या प्रगतीस नवे बळ

गुजर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजाच्या प्रगतीस नवे बळ
बीड | प्रतिनिधी:-धानोरा रोड येथील शिवसेना तथा देवसेना संपर्क कार्यालयात एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी विविध क्षेत्रांत उज्वल कामगिरी करणाऱ्या गुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मांडव जाळी गावचे भूमिपुत्र भरत विठ्ठलराव भांडणे यांची कन्या रूपाली भरत भंडाने हिचा विशेष सत्कार करण्यात आला. रूपालीने *सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी पात्रता सिद्ध केली असून, तिला नाशिकच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील गुजर समाजातून एमबीबीएस होणारी ही दुसरी विद्यार्थीनी असून, यापूर्वी डॉ. मकरंद रतन बहिरवाळ यांनी ही कामगिरी केली होती.
या गौरव सोहळ्यात गुजर समाजाचे पहिले जिल्हाध्यक्ष हनुमान गुजर, दुसरे जिल्हाध्यक्ष अर्जुन बहिरवाळ, सध्याचे देवसेना जिल्हाध्यक्ष रतन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज बहिरवाळ, सुनील गुजर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहिरवाळ, विठ्ठल आबा गुजर, योगेश खटाणे, नारायण खटाणे, शहराध्यक्ष राजू वडमारे, कल्याण निर्मळ, दिनकर चक्रे, सुरेश जगताप आणि इतर अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. सर्वांनी रूपालीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात दुसरा उल्लेखनीय सत्कार मांडव जाळीचेच दुसरे भूमिपुत्र गजानन बहिरवाळ यांच्या मुलाचा करण्यात आला. त्यांच्या मुलाला एका महिन्यात शिक्षक, पोलिस व रयत शिक्षण संस्थेतील प्राध्यापक पदाच्या पाच वेगवेगळ्या ऑर्डर प्राप्त झाल्या असून, तो सध्या प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल गजानन महाराज बहिरवाळ यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, पालकांचे मनोबलही वाढेल, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. “समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान करणे हेच आमचे ध्येय आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली, तर आम्ही तत्काळ मदतीसाठी तयार आहोत,” असे आश्वासन देवसेना गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी दिले.
या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. गुजर समाज सर्व क्षेत्रात भरारी घेत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील आता उच्च शिक्षणात यश मिळवून समाजाचे नाव उज्वल करत आहेत, ही भावना सर्वत्र दिसून आली.


