बीड

पीक विमा कंपन्यांचे दलाल सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर; स्थानिक आपत्तीचा निकष वगळल्याने २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई बंद

पीक विमा कंपन्यांचे दलाल सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर;
स्थानिक आपत्तीचा निकष वगळल्याने २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई बंद
पुर्वीप्रमाणेच “ट्रेगर” करण्यात यावेत – डॉ.गणेश ढवळे
बीड :- (दि.२३)
अगोदरच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात चालढकल होत असतानाच, पीक विमा कंपन्यांचे दलाल झालेले राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. पीक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी पात्र असलेले स्थानिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, काढणीपूर्व किंवा काढणीनंतर झालेले नुकसान, पेरणी न झाल्याने झालेले नुकसान हे महत्वाचे निकषच वगळण्यात आले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचनामा करून मिळणारी २५ टक्के अग्रीम रक्कम आता मिळणार नाही. सरकारने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्या तरी स्थानिक आपत्तीचे “ट्रेगर” रद्द केल्याने आठवडाभरात झालेल्या नुकसान भरपाईची मागणी पीक विम्यातून होणारच नाही. त्यामुळे सरकारने संकटाच्या काळात नियमित हक्काची मदत २५ टक्के अग्रिम देण्यासाठी पुर्वीप्रमाणेच “ट्रेगर” सुरू करावेत, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना करण्यात आली असून सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाचा बदललेला निकष – शेतकरी हवालदिल
राज्य शासनाने पिक विम्याच्या संदर्भाने स्थानिक आपत्तीचा निकष बदलल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच समजले जात होते. पूर्वी विमा योजनेत ४ “ट्रेगर” होते –
सलग ३ आठवडे पावसाने दडी मारली आणि पिके करपली,
अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली,
पिके पाण्यात बुडून नासली,
तक्रारीनंतर पंचनामा करून २५ टक्के अग्रिम दिले जात असे.
यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघत असल्याने दिलासा मिळत असे. पण विमा कंपन्यांनी सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून “अतिवृष्टी” व “कोरडे ट्रेगर” वगळून फक्त पीक कंपनी हा एकमेव ट्रेगर ठेवला आहे.
वांझोट्या पंचनाम्याचा शेतकऱ्यांना उपयोग काय?
या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेकडो हेक्टरवरील खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी या नुकसानीचे फोटो काढून तक्रार करत आहेत. मात्र हे ट्रेगरच उपलब्ध नसल्याने या तक्रारीचा काहीही उपयोग होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या असल्या तरी मागचा अनुभव लक्षात घेता, शासनाची मदत केव्हा मिळेल याचा नेम नाही. त्यामुळे या वांझोट्या पंचनाम्याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग नाही.
शेतकऱ्यांची मागणी
सध्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात नियमित व हक्काची मदत मिळावी यासाठी पीक विमा कंपनीचे ट्रेगर पूर्वीप्रमाणेच सुरू करावेत, अशी ठाम मागणी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
Back to top button