देहू फाटा परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांत भीतीचे वातावरण

देहू फाटा परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांत भीतीचे वातावरण
आळंदी, ता. २७ जुलै (प्रतिनिधी) – देहू फाटा येथील दाभाडे वस्तीमध्ये शनिवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सुभाष दाभाडे यांच्या शेतात घडली असून, संबंधित घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास नागरिकांनी उसाच्या शेतात हालचाल जाणवली. त्यानंतर अधिक पाहणी केली असता, बिबट्याचे अस्तित्व स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासन व पोलीस यंत्रणेला खबर दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. बिबट्या अद्याप आढळून आलेला नसून, तो परिसरातच लपून बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना हाती घ्याव्यात, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे .



