बीड

जगातील पहिली सरसकट कर्जमुक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी केली – श्रीकृष्ण महाराज उबाळे

जगातील पहिली सरसकट कर्जमुक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी केली – श्रीकृष्ण महाराज उबाळे
बेलेश्वर संस्थान येथे अधिक मासानिमित्त कीर्तनसेवा संपन्न
बीड (प्रतिनिधी) : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी मागणी केली नसताना समाजहिताचा विचार करून सरसकट कर्जमुक्ती केल्याचे उदाहरण इतिहासात आढळते. त्यामुळे आजच्या शासनाने देखील शेतकऱ्यांना विविध जाचक नियम व अटींमध्ये न अडकवता संत तुकाराम महाराजांचा आदर्श समोर ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे यांनी केले. बेळगाव येथील सुप्रसिद्ध बेलेश्वर संस्थान आयोजित अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामध्ये आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी कीर्तनासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांचा “पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनी आंधळा बराच मी ॥” हा प्रसिद्ध अभंग घेतला. या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील वाढती नैतिक अधोगती, वाईट पाहण्याची प्रवृत्ती, वाईट ऐकणे, वाईट बोलणे तसेच महिलांकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनावर प्रभावी शब्दांत प्रबोधन केले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेश उलगडताना त्यांनी संत विचारांची सामाजिक उपयुक्तता स्पष्ट केली. समाजात सदाचार, संयम, विवेक आणि चारित्र्य यांचे महत्त्व अधोरेखित करताना संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील अनेक प्रेरणादायी उदाहरणे उपस्थितांसमोर मांडली. अधिक मास हा भक्ती, साधना आणि आत्मपरीक्षणाचा काळ असल्याचे सांगत त्यांनी हरिनाम, संतविचार आणि समाजप्रबोधन यांचे महत्त्व विशद केले. कीर्तन सेवेदरम्यान उपस्थित वारकरी व भाविक भक्तांनी हरिनामाच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास महंत ह.भ.प. महादेव महाराज भारती, गुरुवर्य शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, संतोष महाराज डोंगरे, बबन महाराज बहिरवाळ, ह.भ.प. येडे महाराज, ह.भ.प. शेळके महाराज, ह.भ.प. पाहुणे महाराज यांच्यासह टाळकरी, मृदंगाचार्य, वारकरी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन सेवेचा समारोप हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात झाला. कीर्तनसेवेनंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची पंगत झाली.
Back to top button