बीड

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय; इनहाऊस कोटा वाढवण्याची मागणी

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय; इनहाऊस कोटा वाढवण्याची मागणी

जामखेड प्रतिनिधी:शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू झालेल्या ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शैक्षणिक संस्थांनी केला आहे. संस्थाअंतर्गत (इनहाऊस) कोटा फक्त १० टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात आला असून, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी ५० टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.

यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात शिक्षण सेवा देणाऱ्या संस्थांना स्वतःच्या गावातील किंवा १०-१५ किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

“ग्रामीण भागात आमच्या संस्थांनी गोरगरीब, शेतकरी, मजूर, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मात्र १० टक्के कोट्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशच अडचणीत आला आहे. हा कोटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवावा,” अशी मागणी संस्थांनी केली आहे.

तसेच, ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळांची प्रवेश क्षमता ८० वरून थेट ६० इतकी कमी करण्यात आली असून, यामुळेही शाळांवर मर्यादा आल्याची भावना आहे.

या निर्णयाविरोधात जामखेड तालुका शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी विधान परिषद सभापती मा. प्रा. राम शिंदे व शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

“गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम या संस्थांनी केलं आहे. आता इनहाऊस कोटा आणि प्रवेश क्षमतेसंबंधीच्या निर्णयामुळे हा प्रवाहच अडथळ्यात येतोय. अन्याय सहन केला जाणार नाही. गरज भासल्यास विद्यार्थी, पालक आणि संस्था रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही डॉ. संजय भोरे यांनी दिला आहे.

*कोट*

“गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी संस्थांनी दिली आहे. मात्र केवळ १० टक्के इनहाऊस कोटा दिल्याने आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं कठीण होणार आहे. हा ग्रामीण भागावर होणारा अन्याय आहे. कोटा किमान ५० टक्के करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.तसेच 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण भागातील विध्यार्थी व पालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे
ग्रामीण भागात नेटवर्क ची उपलब्धता कमी असल्याने ऑनलाईन नोंदणी व प्रवेश प्रक्रियेत त्यांना त्रास होत आहे व त्यामुळे अधिकचा वेळा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे
शासनाने ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक होते, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक गोंधळात आहेत.

डॉ. संजय भोरे
अध्यक्ष – सनराईज् मेडिकल ॲण्ड एज्युकेशन फाऊंडेशन, जामखेड

Back to top button