बीड
फक्राबादमध्ये थरारक घटना: चुलत्यावर काठी-चाकूने हल्ला

फक्राबादमध्ये थरारक घटना: चुलत्यावर काठी-चाकूने हल्ला
एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात,तपास सुरू
जामखेड प्रतिनिधी: जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे कौटुंबिक वादातून चुलत्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी राहुल तुकाराम काळे (वय २५, व्यवसाय मजुरी, रा. फक्राबाद) हे आपल्या कुटुंबासह वडील तुकाराम सुर्यभान काळे (वय ५०) यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. फिर्यादीनुसार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे आणि तुळसाबाई एकनाथ काळे हे फिर्यादीच्या घरी आले. “तुम्ही कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे का सांगितले?” असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ व धमकी दिली. त्यावेळी वाद मिटल्याचे सांगण्यात येते.
मात्र दुसऱ्याच दिवशी, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता आरोपी तिघेही फक्राबाद येथील झोपडपट्टी भागात आले. त्यांनी तुकाराम काळे यांना काठीने मारहाण करत चाकूने डोक्यात व खांद्यावर वार केले. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत तुकाराम काळे यांना तातडीने जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मयताचा मुलगा राहुल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी वैभव एकनाथ काळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.


