बीड

बीड क्रिकेट असोसिएशनचे गतिमान सचिव आमेर सलीम; जिल्ह्यात क्रिकेट विकासाला नवी दिशा

बीड क्रिकेट असोसिएशनचे गतिमान सचिव आमेर सलीम; जिल्ह्यात क्रिकेट विकासाला नवी दिशा
बीड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात क्रिके टच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये बीड क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून त्यांनी ही जबाबदारी सातत्याने सांभाळत जिल्ह्यातील क्रिकेटचा दर्जा आणि व्याप्ती लक्षणीयरीत्या उंचावली आहे.
आमेर सलीम यांनी पदभार स्वीकारला त्या काळात बीड जिल्ह्यात क्रिकेटच्या पायाभूत सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. खेळाडूंना दर्जेदार मैदाने, गुणवत्तापूर्ण स्पर्धा आणि संघटनात्मक पाठबळाचा अभाव जाणवत होता. मात्र, आपल्या प्रशासकीय कौशल्य, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी क्रिकेट असोसिएशनला सक्षम, संघटित आणि विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून उभे केले.
त्यांच्या कार्यकाळात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांना शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले. नियमित लीग सामने, नोंदणीकृत क्लब प्रणाली, पंच प्रशिक्षण कार्यक्रम आणि पारदर्शक निवड चाचण्यांमुळे क्रिकेट व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता निर्माण झाली. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी तालुकास्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यातून अनेक होतकरू खेळाडू पुढे आले.
त्यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विभागीय आणि राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली असून काहींनी रणजी, विद्यापीठ, कॉर्पोरेट तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपर्यंत मजल मारली आहे. सचिन संजय धस यांनी भारताच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले असून रणजी क्रिकेटमध्येही त्यांनी स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये अमोल गवसकर, अमोल ससाणे, गोपाळ गुरखुडे, नासेर मोमीन, ऋषिकेश सोनवणे, देवो नवले, वेंकटेश हुरकुडे, श्रावण गलफाडे, सौरभ नवले, शौर्य जाधव, मधुसूदन क्लंत्री, कृष्णा गायकवाड आणि समर्थ कदम यांचा समावेश आहे.
महिला क्रिकेटमध्येही जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून सोनम टंडले, मुक्ता मग्रे, साक्षी शिंदे आणि अनुश्री स्वामी यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
मैदान विकास, आधुनिक सुविधा उभारणी, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे आणि प्रायोजक मिळविणे या क्षेत्रांतही सलीम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. क्रिकेट हा केवळ खेळ नसून युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
असोसिएशनच्या कार्याला अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य दिले आहे. त्यामध्ये डॉ. योगेश क्षीरसागर, अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष, शेख अब्दुल रहीम, महेश वाघमारे, राजन साळवी, सुनील गोपी शेट्टी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, रिझवान खान, प्रा. जावेद पाशा, सय्यद शाकेर, शुभम धूत, खान जैतुल्लाह, संजय उडाण, आरेफ शेख, मोमीन सरफराज, देशमुख सिद्दीक़, अतीक कुरेशी, अक्षय नरवाडे, पठाण शाहरुख  यांच्यासह घरातील सर्वांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभले. तळागाळातील क्रिकेट प्रतिभेला प्रोत्साहन देत आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या ध्येयाने आमेर सलीम यांचे नेतृत्व बीड जिल्ह्यातील क्रिकेटच्या भवितव्याला नवी दिशा देत आहे.
Back to top button