बीड

जामखेड येथे शेतकरी भवनासाठी प्रस्तावास तातडीची मंजूरी द्या – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

जामखेड येथे शेतकरी भवनासाठी प्रस्तावास तातडीची मंजूरी द्या – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

जामखेड प्रतिनिधी: जामखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी सादर केलेल्या बांधकाम प्रस्तावास तातडीने मंजूरी द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.

कर्जत आणि जामखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. १२) विधानभवन, मुंबई येथे सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव वि.ल. लहाने, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, संचालक डॉ. गणेश जगताप, सचिव सय्यद वाहेद, तसेच पणन विभागाचे संचालक रसाळ आणि उपसंचालक निंबाळकर आदी उपस्थित होते.

जामखेड येथील शेतकरी भवनासाठी २२ एप्रिल २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळाली असून, या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी शासन अनुदानातून तर उर्वरित ५० टक्के बाजार समितीने शासन अनुदान कर्जाद्वारे उभारायचा आहे. दरम्यान, कर्जत बाजार समितीचाही शेतकरी भवन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश सभापती शिंदे यांनी दिले. तसेच नियमांनुसार बाजार समितीकडून येणाऱ्या इतर प्रस्तावांनाही तातडीने मान्यता द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button