
न्यायदानाचे चाक थांबले! श्रीवर्धन न्यायालयात शुकशुकाट
‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; पक्षकार व वकिलांची मोठी कोंडी
श्रीवर्धन (संदेश घोलप)
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज (दि. १७) पासून पुकारलेल्या बेमुदत संपाचे तीव्र पडसाद श्रीवर्धनमध्येही उमटले आहेत. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे श्रीवर्धन न्यायालय परिसरात दिवसभर शुकशुकाट पसरला होता. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन आणि ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मुद्द्यांवरून राज्यातील चार प्रमुख कर्मचारी संघटनांनी एकत्र येत शासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे.
या संपामुळे न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, तारखांसाठी आलेले पक्षकार आणि वकिलांची मोठी गैरसोय झाली आहे.
चार संघटनांची वज्रमूठ
न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा कणा असलेल्या खालील चार संघटना या आंदोलनात एकत्र उतरल्या आहेत:
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क)
महाराष्ट्र स्टेनो टायपिस्ट असोसिएशन
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट ड)
असमानतेविरुद्ध संतापाचा उद्रेक
न्यायालयीन नोंदी ठेवण्यापासून ते कागदपत्रांची हाताळणी, प्रकरणांची प्रक्रिया आणि समन्स बजावण्यापर्यंतची सर्व महत्त्वाची जबाबदारी हे कर्मचारी पार पाडतात. मात्र, कामाचे स्वरूप समान असूनही वेतन व सेवासुविधांमध्ये दुजाभाव केला जात असल्याची तीव्र भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. हा लढा केवळ आर्थिक लाभासाठी नसून समान जबाबदारी पार पाडणाऱ्यांना समान न्याय मिळावा यासाठी आहे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
”मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही!”
कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सामान्य नागरिकांच्या हेळसांडीची भीती
न्यायाच्या आशेने दूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि पक्षकारांना या बंदचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. न्यायप्रक्रियेत निर्माण झालेला हा पेचप्रसंग तातडीने सुटावा आणि प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिक आणि वकीलवर्गातून व्यक्त होत आहे.



