बीड
दुष्काळाच्या सावटाखाली दिवाळी : राज्यात दुष्काळ असताना म्हसळ्यात थाटामाटात राजकीय दीपोत्सव!

दुष्काळाच्या सावटाखाली दिवाळी : राज्यात दुष्काळ असताना म्हसळ्यात थाटामाटात राजकीय दीपोत्सव!
म्हसळा (संदेश घोलप)
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण सावट पसरले असून, शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य जनता हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. राज्य सरकारने राज्यभरात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असतानाच, दुसरीकडे म्हसळा नगरीत सत्ताधारी पक्षाच्या वतीने एका भव्य ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. जनतेच्या डोळ्यात पाणी असताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेला हा शक्तिप्रदर्शन सोहळा आता सर्वसामान्य नागरिकांच्या आणि विरोधकांच्या टीकेचा मुख्य विषय ठरला आहे.
दुष्काळी झळांकडे दुर्लक्ष करून भव्य आयोजन
सध्या बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा संवेदनशील आणि बिकट परिस्थितीत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दिमाखदार दीपोत्सव साजरा करणे कितपत योग्य आहे, असा सवाल म्हसळा तालुक्यातून उपस्थित केला जात आहे. उत्सवाच्या नावाखाली करण्यात आलेला हा खर्च आणि रोषणाी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
सांस्कृतिक मैफिली आणि सत्कार सोहळ्यांचा धडाका
केवळ दीपोत्सवच नव्हे, तर या कार्यक्रमात विशेष रांगोळी प्रदर्शन आणि सदाबहार मराठी गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मैफलदेखील सजवण्यात आली होती. राजकीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगलेल्या या संगीत कार्यक्रमात कलाकारांचे सत्कारही करण्यात आले. एका बाजूला जनता संकटात असताना दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या उपस्थितीत झालेले हे जल्लोषाचे कार्यक्रम जनतेच्या जिव्हारी लागल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा मोठा गोतावळा
या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षाचे राज्य पातळीवरील मोठे नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या या संपूर्ण यंत्रणेने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य बाजूला सारून या राजकीय उत्सवात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी अशा प्रकारे दिमाखदार राजकीय उत्सव साजरे करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे.



