📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडमध्ये ११ नोव्हेंबरला रंगणार ‘भजन जॅमिंग’; भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड:-

बीडमध्ये ११ नोव्हेंबरला रंगणार ‘भजन जॅमिंग’; भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड:-
भक्तीचा आनंद, संगीताची ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम घडविणारा ‘भजन जॅमिंग’ हा आगळावेगळा कार्यक्रम बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता माँ वैष्णवी पॅलेस, बीड येथे रंगणार आहे. रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन आणि पद्माक्षी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायक मंगेश देशपांडे यांच्या भक्तिगीतांची विशेष मैफल हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
पारंपरिक भजनाच्या मैफलीपेक्षा ‘भजन जॅमिंग’ची संकल्पना वेगळी आहे. व्यासपीठावर कलाकाराने गायचे आणि समोर बसलेल्या रसिकांनी केवळ ऐकायचे, एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित राहणार नाही. कलाकारांसोबत उपस्थित रसिकांनाही गायन, नामस्मरण, टाळ्या आणि भक्तीच्या उत्साहात सहभागी करून घेत संपूर्ण वातावरणाला एका भक्तिमय लयीत जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
लोकप्रिय भक्तिरचनांचा या मैफलीत समावेश राहणार आहे. युवा पिढीलाही भक्तिसंगीताशी नव्या स्वरूपात जोडता यावे, यासाठी संगीत, प्रकाशयोजना आणि दृकश्राव्य सादरीकरणाचा कल्पक वापर करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी भव्य रंगमंच आणि विस्तीर्ण एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून प्रत्येक भजनाच्या भावविश्वाला साजेशी दृश्ये त्यावर साकारली जाणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमामागे महत्त्वाचा सामाजिक उद्देश आहे. कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून प्राप्त होणारा निधी शासकीय रुग्णालय, बीड येथे नवजात बालकांसाठी ‘रोटरी NICU सेंटर’ उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
अकाली जन्मलेली, कमी वजनाची अथवा जन्मानंतर अतिदक्षता उपचारांची आवश्यकता असलेली बालके आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक सक्षम उपचार सुविधा बीडमध्ये उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रोटरीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यामुळे ‘भजन जॅमिंग’चे तिकीट हे केवळ एका संगीत मैफलीचे प्रवेश तिकीट न राहता एखाद्या चिमुकल्या जीवाच्या निरोगी भविष्यासाठी दिलेला मदतीचा हात ठरणार आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या सामाजिक उपक्रमाला शहरातील विविध उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठाने, आरोग्य संस्था आणि उद्योजकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  कार्यक्रमासाठी ₹३००, ₹५०० आणि ₹७०० अशा विविध श्रेणींमध्ये प्रवेशिका उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वतःसह कुटुंबीय, मित्रपरिवार यांना सोबत आणावे तसेच आपल्या कार्यालयातील कर्मचारी व सहकाऱ्यांना तिकिटे भेट देऊन त्यांनाही या सामाजिक उपक्रमात सहभागी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘भजन जॅमिंग’च्या माध्यमातून उभ्या राहत असलेल्या रोटरी NICU सेंटरच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष रो. चंद्रप्रकाश सेठी, सचिव रो. मनोज थिगळे, प्रोजेक्ट चेअरमन रो. दिनेश लोळगे आणि रो. सुरेश बुधदेव यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य नियोजन करत आहेत.
पद्माक्षी ग्रुपच्या मीनाक्षी सिकची आणि पद्मा बियाणी यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांचाही कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग आहे.
कार्यक्रमस्थळी रसिकांसाठी विविध श्रेणींमध्ये आसनव्यवस्था करण्यात येत आहे. रंगमंचाच्या जवळ भक्तीत मुक्तपणे सहभागी होता यावे यासाठी स्वतंत्र ‘भक्ती क्षेत्र’ ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत शांतपणे मैफलीचा आनंद घेऊ इच्छिणारे आणि भजनाच्या तालावर प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणारे अशा दोन्ही प्रकारच्या रसिकांचा विचार नियोजनात करण्यात आला आहे.
‘एक संध्याकाळ भक्तीची… एक मदतीचा हात चिमुकल्या जीवांसाठी’ “एक संध्याकाळ भक्तीची, एक भेट आपल्या माणसांसाठी आणि एक मदतीचा हात चिमुकल्या जीवांसाठी” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला बीडकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिसंगीताचा आनंद घ्यावा आणि रोटरी NICU सेंटरच्या उभारणीस हातभार लावावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन आणि पद्माक्षी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button