संपादकीय

‘व्वा! काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!” सेनेने काढला भाजपाला चिमटा

 

पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी या निर्णयाचे तोंडभरून कटुक केले आहे. तसेच याच मुद्दयावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाला टोला लगावला आहे. काय हा ‘मास्टर स्ट्रोक” असे म्हणत पंतप्रधान मोदींसहीत भाजपालाही या मुद्द्यावरुन चिमटा काढला आहे. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

‘पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. काळे कायदे व शेतकऱ्यांचे हक्क चिरडणारे म्हणून या तीन कृषी कायद्यांची बदनामी झाली होती. शेतजमिनी, कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी भांडवलदारांच्या घशात घालणाऱ्या या कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारने कायदे मंजूर करून घेतले, विरोधकांचा आवाज दडपण्यात आला व काही झाले तरी माघार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी घेतली.

एवढेच नव्हे तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणातील शेतकरी गाझीपूर-सिंघू बॉर्डरवर आंदोलनासाठी बसला तेव्हा त्या आंदोलनाकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. त्या शेतकऱ्यांचे वीज, पाणी बंद केले. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हटले नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, पाकिस्तानवादी, दहशतवादी ठरवून बदनाम केले,’ असे या कृषी कायद्यांच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडतानाच भाजपावर निशाणा साधताना शिवसेनेने म्हटले आहे.

Back to top button