संपादकीय

आई-वडिलांच्या आत्महत्येमुळे लहान मुल झाली पोरकी !

 

ठाणे | उल्हासनगरात राजीव गांधीनगरमध्ये राहणाऱ्या सचिन सुतार व त्यांची पत्नी शर्वरी यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी त्यांची दाेन लहान मुले झोपेतून उठल्यानंतर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे, तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ अशी ५ ते ६ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यामुळे घराची परिस्थितीत हलाखीची बनत चालली होती.

दरम्यान, दिवाळीनिमित्त रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी परत आले. स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहर, जिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर त्यांना आई-वडील मृतावस्थेत दिसले. त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना ही माहिती दिल्याने परिसरात खळबळ उडाली.

Back to top button