बीड

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून ५ शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून ५ शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

*अंबाजोगाई (प्रतिनिधी)बालाजी देशमुख*
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, नागपूर – पुणे यांच्या वतीने अंबाजोगाई येथील ५ शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार, दिनांक ३ जानेवारी रोजी शहरातील गटशिक्षण कार्यालयाच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून अंबाजोगाई येथील ५ शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक प्रा.गौतम गायकवाड, ऍड.माणिकराव आदमाने, पत्रकार डॉ.संतोष बोबडे, महासंघाचे जिल्हा सचिव राहुल पोटभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालनताई जोगदंड (तालुकाध्यक्षा) या होत्या, तर यावेळी विजया मुरलीधर धिवार (गायकवाड), आशालता नारायण धापसे, रोहिणी शेषेराव जगताप, ज्योती हनुमंतराव भोसले आणि संघमित्रा विक्रम लांडगे (वाघमारे) यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल आणि पुष्पहार असे होते. तसेच या समारंभात बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल धनंजय वाघमारे व आंबादास काळे यांचा आणि विभागीय ऑलिम्पियाड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रूपेंद्र शामराव बडोले यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना पर्यवेक्षिका आशालता धापसे यांनी सांगितले की, माझ्या माईंच्या नांवे मला माझ्या महाराष्ट्र कास्ट्राईब कल्याण महासंघ, नागपुर-पुणे यांनी आदर्श शिक्षिका – पर्यवेक्षीका पुरस्कार देवून सन्मानित केले. खरं तर मला वाटते की, माझे कार्य एवढ्या मोठ्या महान क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या नांवे पुरस्कार घेण्याएवढे निश्चितच मोठे नसावे. पण, आपण केलेल्या कामावर आपल्यापेक्षा इतरांचे जास्त लक्ष असते आणि हेच लक्ष माझ्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवले असावे. माझ्या या संघटनेला मी शब्द देते की, मी यापुढेही माझ्या कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेर ही कोणाच्या दबावाला बळी न पडता, कोणालाही न घाबरता, माझे कार्य अविरत सुरू ठेवीन व माझ्या सावित्रीमाईंच्या लेकींना जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तेथे त्यांच्या पाठीशी निश्चितच खंबीरपणे उभी राहिल अशी ग्वाही पर्यवेक्षिका धापसे यांनी दिली. यावेळी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांनी विषद केली. तर साहित्यिक प्रा.गौतम गायकवाड, ऍड.माणिक आदमाने व डॉ.संतोष बोबडे यांनी मौलिक विचार व्यक्त केले. शालनताई जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोप केला. या प्रसंगी विजया मुरलीधर धिवार यांनी मी सावित्री बोलतेय हि एकपात्री एकांकिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी येलाले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष सोनेराव लगसकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महादेव गायकवाड, बी.एन.गायकवाड, बप्पा कदम, डॉ.रवींद्र आचार्य, एम.एम.गायकवाड, गौतम जोगदंड, धिमधिमे सर्जेराव, पतकराव सर, धिवार सर, प्रतिभाताई गायकवाड, रमाताई दासुद, गंगाधर डोणे, व्यंकट वाघमारे, विनायक चव्हाण, बापूराव धारेकर, इंगोले सर यांनी पुढाकार घेतला. तर यावेळी पत्रकार अरूण गंगणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सत्कारमुर्तींचे आप्तेष्ट, नातेवाईक उपस्थित होते.

Back to top button