बीड

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसेवेचा बोजवारा; २२ उपकेंद्रे इमारतीविना! मोडकळीस आलेल्या उपकेंद्रांची तातडीने दुरुस्ती करा – डॉ. गणेश ढवळे

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसेवेचा बोजवारा; २२ उपकेंद्रे इमारतीविना! मोडकळीस आलेल्या उपकेंद्रांची तातडीने दुरुस्ती करा – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१४) – ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेली उपकेंद्रे आज स्वतःच अडचणीत सापडली आहेत. माता-बाल संगोपन, लसीकरण, गर्भवतींची तपासणी, साथीचे रोग प्रतिबंधक उपाय आणि प्राथमिक उपचार देणारी अनेक उपकेंद्रे आज भाड्याच्या खोल्यांत, अंगणवाड्यांत किंवा ग्रामपंचायतीच्या जीर्ण इमारतींत चालत आहेत. काही ठिकाणी इमारती नसल्याने तर काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या अवस्थेत सेवा दिली जात असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन देऊन २२ उपकेंद्रांना तातडीने इमारत निधी देण्याची व जीर्ण उपकेंद्रांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
५४ प्राथमिक आरोग्य केंद्रे; ३०० हून अधिक उपकेंद्रे
बीड जिल्हा येथे एकूण ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३०० हून अधिक उपकेंद्रे आहेत. त्यापैकी २२ उपकेंद्रांना ग्रामपंचायतीकडून जागाच उपलब्ध नसल्याने इमारत बांधकाम होऊ शकलेले नाही.
२२ उपकेंद्रे इमारतीविना
ज्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी इमारतीच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खालील ठिकाणी उपकेंद्रांना जागा व इमारत उपलब्ध नाही:
बीड तालुका – पेंडगाव, ईट, नेकनूर, मांजरसुंभा
गेवराई – आगर नांदूर, चोपड्याची वाडी, भेंड टाकळी, तळवट बोरगाव, हिवरवाडी, आहेर वडगाव
आष्टी – पिंपळगाव घाट, जोगेश्वरी पारगाव
धारूर – धारूर ग्रामीण
माजलगाव – भाटवडगाव, माजलगाव
अंबेजोगाई – जोगाईवाडी, शेपवाडी
परळी – संगम
पाटोदा – पिंपळवाडी
शिरूर कासार – कान्होबाची वाडी
बोरखेड उपकेंद्राची जिर्णावस्था
बीड तालुक्यातील बालाघाटावरील बोरखेड येथील उपकेंद्र सुमारे ४० वर्षे जुने असून सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. सीएचओ, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका जीव मुठीत धरून दोन गावे व दहा वस्त्यांवरील ग्रामस्थांना सेवा देत आहेत. मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तातडीने दुरुस्ती किंवा नव्या इमारतीसाठी निधी देण्याची मागणी सरपंच सुनिल अनपट व ग्रामस्थांनी केली आहे.
कर्मचारी व व्यवस्थापनातील अडचणी
काही ठिकाणी कर्मचारी नियुक्त असूनही उपकेंद्रांना कुलूप लागल्याचे दिसून येते. इमारत नसल्याचे कारण पुढे करून सेवा खंडित ठेवली जात असल्याने गोरगरिब रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची ही दुरवस्था तातडीने दूर करून सर्व उपकेंद्रांना स्वतंत्र, सुरक्षित इमारती उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button