बीड

“विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय” – प्राचार्य अन्वर शेख

“विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय” – प्राचार्य अन्वर शेख
 माउंट लिटरा झी स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा भव्य शपथविधी समारंभ
माजलगाव प्रतिनिधी :-“विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे,” असा प्रेरणादायी संदेश बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष तथा सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख यांनी माउंट लिटरा झी स्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ शपथविधी समारंभात दिला. त्यांनी नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे तर इतरांसाठी आदर्श निर्माण करणे होय, असेही म्हटले.
सविस्तर वृत्त असे की २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा हा महत्त्वाचा समारंभ शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे तसेच परळी तहसीलचे माजी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांची उपस्थिती होती. प्राचार्य अन्वर शेख यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत नेतृत्व, जबाबदारी व समाजसेवा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी यांवर विशेष भर देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मान्यवरांनी सांगितले की खरे नेते ते असतात जे इतरांसाठी उदाहरण ठरतात आणि त्यांच्या कृतींतून प्रेरणा देतात. शाळेच्या मतदानाद्वारे निवडले गेलेल्या कॅप्टन, हेड बॉय, हेड गर्ल व विविध हाऊस लीडर्सचा गौरव सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी देशभक्ती व नेतृत्वाची शपथ घेऊन शाळेच्या शिस्त व कार्यक्षमतेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. शपथविधी संपन्न झाल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष डॉ. हरीशचंद्र वंगे दादा, उपाध्यक्ष प्रा. कैलास घुगे आणि प्राचार्य मंगेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य जल्लोषात साजरा करण्यात आला. पाहुण्यांच्या स्वागतानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रार्थना, स्वागत गीत व देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य मंगेश काशीद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडला.
या शपथविधी समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव व संघभावना जागृत झाली आहे. पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ शपथविधी समारंभ सोहळ्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संघर्षातून प्रगतीच्या दिशेने आणखी एक मोलाचे पाऊल टाकताना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
Back to top button