
मानसिक आरोग्यासाठी ईश्वर भक्तीची गरज – प्रदीप मिश्रा
आज चाकरवाडी जोरदार वाऱ्या सह पाऊस
श्री क्षेत्र चाकरवाडी / प्रतिनिधी : सध्याच्या परिस्थितीत माणूस हा पूर्णपणे खचलेला आहे. गोंधळलेला आहे मुलं ऐकत नाहीत, पत्नी ऐकत नाही, आई-वडिलांच मुले ऐकत नाहीत, सर्वत्र गोंधळाची परिस्थिती असून माणूस हा मानसिक दृष्ट्या गोंधळलेला आहे अशा परिस्थिती मानसिक आरोग्यासाठी ईश्वर भक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन परमपूज्य प्रदीप जी मिश्रा यांनी केले.
चाकरवाडी येथील विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने व तपो निधी शांती ब्रह्म गुरुवर्य महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराणकथेत दीपक जी मिश्रा बोलत होते.
ईश्वर भक्ती हीच माणसाला स्थैर्य लाभून देते. त्यामुळे ईश्वरभक्तीतच मोठा आनंद असल्याचे प्रदीपजी मिश्रा यांनी सांगून पुढे ते म्हणाले की ईश्वर सेवा ही तर महत्त्वाची आहेच त्याशिवाय दिन दलित दुःखी त्यांची सेवा करणे यात सुद्धा ईश्वर भक्तीचा सार आहे. गरिबांच्या सेवेतूनही देव मिळतो शरीराला आजार झाला तर तो नष्ट करण्यासाठी औषधी घेतल्या जातात मात्र मनाला झालेला रोग हा केवळ ईश्वर भक्तीतून दूर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने ईश्वरभक्ती करणे गरजेचे आहे ईश्वर भक्ती केल्यानेच मानसिक आजार दूर होऊ शकतात एवढी ताकद ईश्वर भक्ती मध्ये आहे. माणूस कोण आहे आणि कोठे बसलेला आहे यावर त्याचे महत्त्व विशद होते. दारूचा, अड्डा जुगाराचा अड्डा आणि संत संगत या तीन पैकी संत संगतीत माणसाचे महत्त्व नक्कीच अधिक असते. शिवशंकर हे भोळे असून अपार श्रद्धा आणि भक्ती करणाऱ्या भक्ताला ते पावन होतात पैशाने श्रीमंत असून चालत नाही शरीराला झालेला रोग पैशाने आणि औषधाने कमी करता येईल, परंतु मनाला झालेला रोग हा केवळ अध्यात्मात आणि ईश्वर भक्तीतून दूर होऊ शकतो, असे मार्गदर्शन यावेळी प्रदीप जी मिश्रा यांनी केले.
चौकट
भजनात महाराज तल्लीन
चाकरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथे भजन गात असताना महादेव महाराज चाकरवाडी कर व नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर हे भाविक भक्तासोबतच भजनात तल्लीन झाल्याचे चित्र आज शिवपुराण कथेच्या प्रसंगी दिसून आले.
चौकट
मान्यवरांची भेट
चाकरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराणकथेस गुरुवारी आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार संगीता ठोंबरे जिल्ह्याचे नेते रमेश आडसकर सह संत महंतांनी भेटी देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
चौकट
आठ वर्षापासून उपस्थिती
चाकरवाडी येथील महान संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास काशी विश्वनाथ मंदिराचे आचार्य पुजारी गणेश शास्त्री द्रविड गत आठ वर्षापासून उपस्थित राहून भाविकांसोबत ईश्वर भक्तीचा लाभ घेत आहे.


