सारोळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…!

सारोळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…!
जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शुक्रवार,दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सारोळा येथील हनुमान जन्मोत्सव तथा ग्रामयात्रेचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीत,नृत्य,नाटिका, लोककला व सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि शालेय जीवनात सांस्कृतिक जडणघडण घडावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिह्यात सलग दोन वर्ष द्वितीय क्रमांक संपादन करत पाच लक्ष रूपये बक्षिसाची मानकरी,SQAAF मूल्यांकनात राज्यस्तरावर मानांकन प्राप्त शाळा,आय.एस.ओ,डिजिटल, उपक्रमशील व आदर्श शाळा तसेच लोकसहभागातून निर्माण झालेले पवित्र ज्ञानमंदिर म्हणून या शाळेची सर्वत्र ओळख आहे. शाळेने दरवर्षी एक लाख पेक्षा जास्त बक्षीसरुपी लोकसहभाग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून प्राप्त केला असून यावर्षी उच्चांकी बक्षीसरुपी लोकसहभाग मिळविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शाळेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध अधिकारी, कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, पोलिस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,माता,पालक, युवक मंडळ व ग्रामस्थांना उपस्थित राहून बालकलाकारांचे कौतुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.



