शिवसेनेच्या महिला खासदाराने भाजप नेत्यांना पाठवली नोटीस

मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद ताजा असतानाच भाजप नेते आशिष शेलार आणखी एका नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी माझी प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला आहे. चतुर्वेदी यांनी या दोघांनाही कायदेशीर नोटीस धाडली आहे.
यामध्ये आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी आपली बिनशर्त लेखी माफी मागावी, असे म्हटले आहे. त्यामुळे आता आशिष शेलार आणि अतुल भातखळकर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आशिष शेलार यांनी एका पत्रकारपरिषदेत प्रियांका चतुर्वेदी यांच्या विधानाची मोडतोड करुन ते सादर केले होते. आम्ही सावरकरांप्रमाणे माफी मागणार नाही, असे प्रियांका चतुर्वेदींनी म्हटल्याचे शेलार यांनी सांगितले होते.
तसेच हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान असून चतुर्वेदी यांनी माफी न मागितल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशाराही शेलार यांनी संबंधित पत्रकारपरिषदेत दिला होता. मात्र, प्रियांका चतुर्वेदींनी तशा आशयाचे कोणतेही विधान केले नव्हते. परंतु, शेलार यांच्या आरोपांमुळे चतुर्वेदी यांची इतक्या वर्षांची प्रतिमा मलीन झाली, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यासाठी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी प्रियांका चतुर्वेदी यांची लेखी माफी मागावी, अशी मागणी नोटीसमधून करण्यात आली आहे.