राजकीय

दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादर-नगर हवेली, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

 

दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार मिळवण्याच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दिल्लीच्या दिशेने झेप घेतल्याचं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत असल्यानं आणि यामध्ये शिवसेनेची घोडदौड सुरु असल्यानं संजय राऊत यांनी नुकतचं ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा आपला फोटो पोस्ट केला असून याला कॅप्शन म्हणून “महराष्ट्राच्याबाहेर पहिलं पाऊल दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादरा नगर हवेली” असं कॅप्शन दिलं आहे.

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येमुळं दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होत आहे. सध्या इथे मतमोजणी सुरु असून या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे. इथून शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तिकिट दिलं आहे. त्यांची मुख्य लढत भाजपाच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश दोढी यांच्याबरोबर आहे. मतमोजणीच्या तासाभराच्या कलानुसार, कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या गावित यांच्यावर ५,५०६ मतांनी आघाडी घेतली आहे.

Back to top button