मुंबई

वानखेडेकडे महागड्या वस्तू कुठून आल्या? आता क्रांती रेडकर यांनी दिले उत्तर

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे वापरात असलेल्या महागड्या वस्तूवरून निशाणा साधला होता. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आपल्या स्पेशल आर्मीसोबत वसुली करत असल्याचं आणि कोट्यवधींचे कपडे घालत असल्याचे आरोप केले होते. त्यांनतर वानखेडे यांच्या पत्नी क्रांतीनं पुन्हा एकदा ट्विटरद्वारे नवाब मालिकांवर निशाणा साधला आहे.

क्रांती रेडकरनं ट्विट करत म्हटलं आहे, ‘समीरकडे असलेली सर्व संपत्ती त्याच्या आईकडून मिळालेली आहे. ती ५० किंवा १०० कोटींची नाही. आणि ती समीरकडे वयाच्या १५ व्या वर्षांपासून आहे. सरकारी नियमांनुसार त्यासंबंधी सर्व कागदपत्रे सादर केली जातात. ती संपत्ती बेकायदेशीर नाही. सोबतच मालिकांना टोला देत क्रांतीनं ‘सावन के अंधे को हरियाली दिखती है’ असं म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये हे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र अजूनही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीत. नवाब मलिक सतत नवनवीन आरोप करत खळबळ माजवत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाब मालिका यांनी समीर वानखेडेंवर खंडणीचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी समीर वानखेडे १० कोटींचे कपडे घालत असल्याचा दावा केला होता.

मलिक म्हणाले की, वानखेडे हे, ७० हजाराचा शर्ट आणि ५० लाखांचा घड्याळ घालतात. त्यांच्या बुटाची किंमत २ लाख रुपये असते. तर त्यांनी असं सुद्धा म्हटलं कि,समीर वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांच्या किंमतीपेक्ष जास्त असते. त्यांनतर समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरनं हा ट्विस्ट करत निशाणा साधला आहे.

Back to top button