बीड
ना. पंकजाताई मुंडेंच्या पत्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे पंधरा मिनिटांतच उत्तर !

ना. पंकजाताई मुंडेंच्या पत्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे पंधरा मिनिटांतच उत्तर !
*बीडच्या मंझरी हवेली फाटा महामार्गावर उड्डाण पुलाच्या सर्वेक्षणाचे दिले आदेश*
*बीड जिल्ह्यातील रेल्वे, रस्ते, महामार्गाच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत घेतली भेट*
नवी दिल्ली दि. ०२ —
बीड जिल्ह्यातील रेल्वे, रस्ते आणि महामार्गाच्या प्रश्नांवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील मंझरी हवेली फाटा येथे महामार्गावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन याठिकाणी उड्डाणपूल मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून केवळ पंधरा मिनिटांतच त्यांच्या पत्राला उत्तर मिळाले आणि उड्डाणपुलाच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाले.
ना. पंकजाताई मुंडे आज नवी दिल्लीत होत्या. सकाळी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. बीडचे गुजर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र गुजर यांनी केलेल्या विनंतीवरून बीड – सोलापुर महामार्ग क्र ५२ वरील मंझरी हवेली फाटा हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असल्याने याठिकाणी वारंवार अपघात होतात, हे टाळण्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपूल मंजुर करावा अशी मागणी ना. पंकजाताई मुंडेंनी गडकरी यांच्याकडे केली. या मागणीची गडकरी यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला निर्देश दिले आणि केवळ पंधरा मिनिटांतच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंझरी हवेली फाटा येथे उड्डाणपूलाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि सन २०२६-२७ च्या प्रकल्प आराखड्यात याचा समावेश करत असल्याचे कळवले.
*केंद्रीय रेल्वमंत्र्यांची भेट*
——–
केंद्रीय रेल्वेमंञी अश्विनी वैष्णव यांची देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेतली. या भेटीत बीड जिल्ह्यातील बीड-परळी रेल्वेमार्ग व जिल्ह्यातील रेल्वेच्या इतर समस्यांबाबत सविस्तर निवेदन देवुन चर्चा केली. मुंबई- लातुर, मछलीपट्टणम-बिदर, हैदराबाद-बिदर ह्या रेल्वेसेवा परळी वैजनाथ पर्यंत विस्तारीत कराव्यात तसेच परळी-बीड रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. या मागणीलाही रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचा शब्द दिला.
••••



