बीड

माझ्या विरोधात पंडित-पवार घरातील आठ-आठजण दिवसरात्र प्रचारात – महेश दाभाडे

माझ्या विरोधात पंडित-पवार घरातील
आठ-आठजण दिवसरात्र प्रचारात – महेश दाभाडे
घडीचा गजर वाढताच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली

गेवराई, दि.२२ (प्रतिनिधी) ः- मी एका सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलेलो आहे. माझे वडिल, आजोबा, पंजोबा कोणीही राजकारणात नव्हते. त्यामुळे मला राजकीय वारसा नाही तरीपण माझ्या विरोधात दळभद्री युती करणारे पंडित-पवार घराण्यातील आठ-आठजण दिवसरात्र माझ्या विरोधात प्रचार करतात, मतदारांना धमकावतात हे अतिशय गंभीर आहे. गेवराई तालुक्याचे विकासप्रिय नेते माजी आमदार अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांचे विकासाचे व्हिजन घेऊन मी मतदारांसमोर जात असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. घडीचा गजर होणार आणि गेवराई नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी व्यक्त केला. गेवराई शहरात विविध प्रभागात मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

गेवराई नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप उमेदवारांकडून मतदारांना धमक्याही दिल्या जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाचे व्हिजन घेऊन आपले उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला कसलीही राजकीय पार्श्वभुमी नाही. मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आहे, लोकांशी चांगला संवाद आहे त्यामुळेच मी राजकारणाकडे वळला गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट विरोधकांना रुचली नाही. आज नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पंडित-पवार या दळभद्री युतीकडून माझा अपप्रचार केला जात आहे, प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. मतदारांना धमकावणे, कार्यकर्त्यांना धाक दाखवणे अशा गोष्टी त्यांच्याकडून सुरु असून त्यांच्या पोकळ धमक्यांना तुम्ही घाबरू नका. शिवछत्र परिवार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि विद्यमान आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि गेवराई शहराला लागलेले पवारांचे ग्रहण सोडवा. येणाऱ्या २ डिसेंबर रोजी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन महेश दाभाडे यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button