बीड
नर्मदा परिक्रमेसाठी श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानचे महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांचे प्रस्थान!

नर्मदा परिक्रमेसाठी श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानचे महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांचे प्रस्थान!
भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; पुष्पहार व औक्षण करून दिल्या आध्यात्मिक यात्रेसाठी शुभेच्छा
लिंबागणेश : (दि. १) बीड तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या श्रीक्षेत्र ईश्वरभारती बाबा बेलेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांनी रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी नर्मदा परिक्रमेसाठी प्रस्थान केले. यावेळी त्यांनी बेलेश्वर संस्थान, बेलगाव येथील महादेवाचे तसेच सद्गुरू ईश्वरभारती बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात केली.
याप्रसंगी उपस्थित भाविकांनी महंत तुकाराम महाराज भारती यांना पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा दिल्या, तर सुवासिनी महिलांनी औक्षण करून त्यांना निरोप दिला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या प्रस्थान सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नर्मदा परिक्रमा ही भारतीय आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत पवित्र आणि खडतर धार्मिक यात्रा मानली जाते. नर्मदा मातेच्या तीरावरून केली जाणारी ही परिक्रमा श्रद्धा, संयम, साधना आणि आत्मिक शांतीचा मार्ग मानली जाते. या प्रदीर्घ आध्यात्मिक यात्रेनिमित्त बेलेश्वर संस्थान परिसरासह पंचक्रोशीतील भाविक, भक्तगण आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रस्थान सोहळ्यास ह.भ.प. बबन महाराज बहिरवाळ, ह.भ.प. माधव महाराज डाके, ह.भ.प. श्रीकृष्ण उबाळे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, गणपत तागड यांच्यासह पंचक्रोशीतील आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२


