फिनिक्स क्लासमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे – प्रा. राळेभात

फिनिक्स क्लासमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे – प्रा. राळेभात
फिनिक्स इंग्लिश क्लासचा निरोप समारंभ उत्साहात
जामखेड प्रतिनिधी: इंग्रजी भाषा ही ज्ञानाचे आणि संधींचे दार उघडणारी भाषा असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळविल्यास देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, फिनिक्स क्लासमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी फिनिक्स इंग्लिश क्लासच्या वतीने निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत आपले मनोगत करुन मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक महाराष्ट्र सुर्योदयचे उपसंपादक धनराज पवार, अर्जुन लोंढे, शहाजी हुलगुंडे, प्रा. दशरथ चौधरी, प्रा.आरती राळेभात यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.राळेभात म्हणाले,जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाची भाषा आत्मसात केली पाहिजे. परिस्थितीची कारणे न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते.
फिनिक्स इंग्लिश क्लासचे प्रा. दशरथ कोळेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले ,दहा वर्षांपूर्वी अवघ्या चार ते पाच विद्यार्थ्यांपासून क्लासची सुरुवात झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास यामुळे आज क्लासमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून १५ ते २० गावांमधून विद्यार्थी इंग्रजीचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समर व्हॅकेशन बॅच आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कार्ले व श्रेया अडाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी भोंडवे यांनी मानले.



