बीड
आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत 34 संघांचा उत्स्फूर्त सहभाग; 20 महिला व 14 पुरुष संघ मैदानात

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत 34 संघांचा उत्स्फूर्त सहभाग; 20 महिला व 14 पुरुष संघ मैदानात
बीड प्रतिनिधी : दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो पुरुष व महिला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 34 महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 20 महिला संघ आणि 14 पुरुष संघांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Additional D.S.P.) मा. शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपअधीक्षक (गृह) श्री. राजू नवले साहेब, पोलीस निरीक्षक श्री. बल्लाळ साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्याघर, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे श्री. अविनाश बारगजे तसेच प्रा. जे. पी. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे होते. मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती, शारीरिक क्षमता आणि आत्मसंरक्षणाची भावना विकसित होते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठस्तरीय या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक नियोजन व व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेमुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, खेळाडूंचा उत्साह आणि तायक्वांदो खेळाच्या प्रसाराला निश्चितच चालना मिळणार आहे.


