बीड

संघर्षशील शिक्षक नेते; कॉम्रेड राजकुमार कदम! – कालिदास धपाटे,जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ

संघर्षशील शिक्षक नेते; कॉम्रेड राजकुमार कदम!
– कालिदास धपाटे,जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ.

स्वतःच्या मताचा आग्रह धरत असतानाच समोरच्या व्यक्तिचेही मत आदरपूर्वक विचारात घेणे, समजून घेणे आवश्यक आहे असा व्यापक दृष्टिकोन असणारे आमच मित्र मराठवाडा शिक्षक संघाचे झुंजार लढाऊ सरचिटणीस कॉम्रेड राजकुमार कदम हे आपल्या पस्तीस वर्षाच्या शिक्षकी सेवेतून सहीसलामत निवृत्त होत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. आगदी विद्यार्थी दशेमधे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेमधे त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला सुरवात करून नंतर शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा पत्करली. श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळ, बीड संचलित श्री शिवाजी विद्यालयात शिक्षक आणि नंतर येळंब घाट येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून त्यांची एकूण सेवा तब्बल पस्तीस वर्षांची झाली आहे. या प्रदीर्घ सेवेत राजकुमार कदम यांनी आपली सेवा इमानेइतबारे केली आहेच, त्या बरोबरच त्यांनी आपले सामाजिक दायित्व देखील तितक्याच इमानदारीने निभावले आहे.
वेतनधारी सेवेकरी अर्थात आलिकडे ज्यांना आपण मध्यम वर्गीय म्हणतो, ती माणसे शक्यतो सरळमार्गी असतात. ती आवतीभवती न बघताच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, अर्थात त्यांना त्यामुळे कितपत दिलासा मिळतो याचा शोध घेतल्यास फारसे हाती लागत नाही. राजकुमार कदम सरांचे तसे नाही. ते आवतीभवती बघतच पुढे सरकतात. समाजा मधे जे खाचखळगे आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्याचा मागोवा घेऊन त्यातील अपप्रवृत्तींवर कुठाराघात करतात आणि पिढीतला संघर्षाची दिशा दाखवतात. यासाठीची त्यांची वैचारिक बैठक एकदम पक्की झालेली आहे. मार्क्स, शिव फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जीवनकार्या विषयी आणि वैचारिक मांडणी विषयी त्यांनी आपली बौद्धिक क्षमता तावूनसुलाखून धारदार केलेली आहे.

कम्युनिस्ट आंदोलनात एकदम पारदर्शक आयुष्य व्यतीत करणाऱ्या आणि त्यागी जीवन जगणाऱ्या कॉम्रेड विठ्ठलराव कदम आणि कॉम्रेड अतहर बाबर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचे लेखन करून राजकुमार कदम यांनी आपली बांधिलकी स्पष्ट केली आहे. त्याबरोबरच सत्यशोधक कर्मवीर समाजसुधारक बलभीमराव कदम यांचे चरित्र लिहून मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील समाजसुधारकाची ओळख करून दिली आहे. लोकवाङ्मय गृह मुंबई ने त्यांचे वेध प्रासंगिकांचा हे पुस्तक छापून त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाण कौशल्याचा गुण समोर आणला आहे. राजकुमार कदम यांच्या एकूण विपूल लेखनामधे कुठेही त्यांचा तोल जात नाही किंवा त्यांना दृष्टिकोनाचा, समाजभानाचा विसर पडत नाही हे त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल.


आणि आता “कुठंय सर्वांना शिक्षण?” या पुस्तिकेच्या माध्यमातून सध्याच्या पोकळ शिक्षण व्यवस्थेवर आसुड ओढले आहेत. केवळ धनवानांच्या पाल्यांनाच दर्जेदार शिक्षण आणि सामान्य अतिसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दारे बंद करणारे आरटीई धोरण किती दिशाभूल करणारे आहे याची पोलखोल करून सार्वत्रिक शिक्षणाच्या आग्रहासाठी त्यांनी थेट जनता जनार्धनाच्या महासागरासच आवाहन केले आहे.
शिक्षक संघटना, प्रगतीशील लेखक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलवर सध्या ते कार्यरत आहेत. राजकुमार कदम हे सेवानिवृत्तीनंतर स्वस्थ बसणार नाहीत याची जाणीव आहे. म्हणूनच ते यापुढे अगदी मुक्तपणे त्यांच्या राजकीय सामाजिक कार्यासाठी संघर्षशील मार्गाचा अवलंब करून सदैव कार्यप्रवण राहतील याचा विश्वास वाटतो. त्यांच्या भावी कार्याची जनतेला खूप गरज आहे. म्हणूनच त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवापूर्तीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा देतो…

Back to top button