बीड

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्कर यादीतील ९ दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्कर यादीतील ९ दर्जेदार चित्रपटांची मेजवानी
ऑस्करच्या शर्यतीतील चित्रपट पुण्यात; पिफमध्ये जागतिक सिनेमांचा अनोखा संगम
 सुहास सावंत / पुणे
जगभरातील चित्रपटप्रेमींना भुरळ घालणाऱ्या आणि ऑस्करच्या नामांकन यादीत झळकलेल्या नऊ निवडक चित्रपटांचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) मिळणार आहे. विशेष म्हणजे यापैकी चार चित्रपट ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांच्या यादीतही समाविष्ट आहेत.
दादासाहेब फाळके चित्रनगरी, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५ ते २२ जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर गाजलेले, विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गौरवले गेलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश यंदाच्या पिफमध्ये करण्यात आला आहे.
‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’, ‘सिरात’ आणि ‘इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंट’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांत प्रशंसित ठरले असून ते ग्लोबल सिनेमा विभागात दाखवले जाणार आहेत. याच विभागात अन्य पाच दर्जेदार चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
पॅलेस्टाईन-अमेरिकन दिग्दर्शिका शिरेन दाबीस यांचा ‘ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू’ हा चित्रपट जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात समाविष्ट असून, तो ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पहिल्या यादीत स्थान मिळवणारा ठरला आहे.
याशिवाय ‘साउंड ऑफ फॉलिंग’, ‘द प्रेसिडेंट्स केक’, ‘लेट शिफ्ट’ तसेच ‘कटिंग थ्रू रॉक्स’ हा माहितीपटही महोत्सवात पाहायला मिळणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक पार्क चान-वूक यांचा ‘नो अदर चॉइस’ हा कोरियन ब्लॅक कॉमेडी थ्रिलर चित्रपटदेखील ऑस्करच्या यादीत असल्याने तो विशेष आकर्षण ठरणार आहे.
एकूणच, जागतिक दर्जाचे आणि पुरस्कारप्राप्त चित्रपट एका मंचावर पाहण्याची सुवर्णसंधी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून चित्रपटप्रेमींना लाभणार आहे.
Back to top button