सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी | सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव यावर्षीही जिजाऊ ब्रिगेडतर्फे मोठ्या उत्साहात पार पडला. ३ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान हा १० दिवसांचा उत्सव सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी समृद्ध झाला.
दशरात्रोत्सवाची सुरुवात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली. यावेळी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवमती राजश्री गावंडे (संचालिका, ज्ञानपीठ इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल) यांनी सांभाळले. प्रमुख उपस्थितीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमा बोके, ज्येष्ठ मार्गदर्शिका मीना कोल्हे, तसेच प्रतिभा अढाऊ, प्रियंका मालठाणे, रूपाली देवगिरे, सुमित्रा ढगे, गीता येऊल, संगीता तुरखडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष पल्लवी अढाऊ यांनी केले, संचालन तालुका सचिव स्वाती लहाने यांनी सांभाळले, तर आभार प्रदर्शन सारिका मानकर यांनी केले. हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष सारिका मानकर यांच्या निवासस्थानी पार पडला.
४ जानेवारी रोजी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर यांचा जन्मदिवस कराओके गीतगायनाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ५ जानेवारी रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी वनभोजनाचा आनंद घेतला, तर ६ जानेवारी रोजी ‘वन मिनिट गेम शो’ आयोजित करण्यात आला.
७ जानेवारी रोजी दहिगाव रेचा (ग्रामीण) येथे दृष्टीहीन महिलांना साड्यांचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ८ जानेवारी रोजी हिरापूर येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्रामशाखा स्थापन करण्यात आली. ९ जानेवारी रोजी रजनीताई काळमेघ यांच्या निवासस्थानी समारोप करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांना जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



