📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

पल्स पोलिओ अभियानाला नगरसेविका रुपाली सुधिर देवगिरे यांचा सक्रिय सहभाग; आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित

– पंकज हिरुळकर प्रतिनिधी;

अंजनगाव सुर्जी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ निमित्त अंजनगाव सुर्जी शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या विद्यमान नगरसेविका सौ. रुपाली सुधीर देवगिरे यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत प्रभागातील विविध पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली पात्र बालकांना स्वतःच्या हस्ते पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून अभियानाचा शुभारंभ करत नागरिकांना जनजागृतीचा संदेश दिला.

नगरसेविका देवगिरे यांनी लसीकरण केंद्रांवरील व्यवस्था, उपस्थित बालकांची संख्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांचे अभिनंदन करून त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. त्यांच्या भेटीमुळे केंद्रांवरील वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले.

यावेळी त्यांनी पालकांशी संवाद साधत, “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. कोणतेही मूल या लसीकरणापासून वंचित राहू नये,” असे आवाहन केले. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणासाठी आलेल्या बालकांशी त्यांनी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका देवगिरे यांनी स्वतःच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजल्याने पालकांमध्येही अभियानाबाबत विश्वास आणि जनजागृती वाढल्याचे दिसून आले.

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, आशा व अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात पार पडले. नगरसेविका रुपाली देवगिरे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Back to top button