बीड

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त माजलगावात आयुर्वेद जनजागृती रॅली

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त माजलगावात आयुर्वेद जनजागृती रॅली

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजलगाव :-प्रतिनिधी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून माजलगाव शहरात आयुर्वेद जनजागृती रॅली आणि पथनाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज, माली पारगाव ता. माजलगाव आणि ‘रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल,यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.*

औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रात फार्मासिस्ट (औषधनिर्माता) यांचे असलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि आयुर्वेद या पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.
फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व
दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जगभर ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमध्ये औषध निर्माण तज्ज्ञांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. औषधे तयार करण्यापासून ते त्यांच्या योग्य वापरासाठी रुग्णांना मार्गदर्शन करण्यापर्यंत फार्मासिस्ट आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. या वर्षीच्या फार्मासिस्ट दिनाचा उद्देश, नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी फार्मासिस्ट करत असलेल्या अविरत सेवेची नोंद घेणे हा आहे.
*रॅलीला हिरवा झेंडा*
माजलगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य अमित बिंदू यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकारी अभियोक्ता ऍड. जितेंद्र शिंदे आणि रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष रो. विनोद जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी रोटरी क्लबचे रो.पांडुरंग चांडक, रो.प्रभाकर शेटे, रो. कैलास येलशेटे, रो. शरद यादव रो.सुनील शिंदे, रो.प्रताप धपाटे आणि नारायण गंडे यांसह पत्रकार हरीश यादव दिलीप झगडे संतोष जेथलिया सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*आयुर्वेद आणि पथनाट्याचे सादरीकरण*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या रॅलीत गुरुकृपा फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘आयुर्वेदावर आधारित विविध घोषणा’ असलेले फलक घेऊन विद्यार्थी घोषणा देत मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत होते. ही रॅली छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्याद्वारे ‘आयुर्वेद’ जीवनातील आरोग्य राखण्यासाठी कसा उपयुक्त आहे, याबद्दल जनजागृती करण्यात आली.
आयुर्वेद जनजागृती रॅलीच्या या यशस्वी आयोजनासाठी गुरुकृपा फार्मसीमधील सर्वश्री विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button