अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.
मुंबई (प्रतिनिधी) : आष्टी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात दिनांक १४, १५, १६ सप्टेंबर तसेच काल झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि पुरपरिस्थितीमुळे शेतजमिनींचे व व्यापाऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने मदत व पुनर्वसन कायद्यात उपाययोजना करण्यासाठी साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की,” पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. शासन निर्णयानुसार सध्या मिळणारी ४७ हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून शेतजमिनी पुन्हा तयार करण्यासाठी हेक्टरी किमान दहा लाख रुपये लागणार आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या मनरेगा योजनेंतर्गत अंतर्गत प्रति हेक्टर पाच लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
या शिवाय नदीपात्र बदलल्याने हजारो शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या असून, २०१४-१५ मध्ये दिल्या गेलेल्या मदतीच्या धर्तीवर प्रति विहीर तीन लाख रुपयांचे अनुदान द्यावे किंवा नवीन विहिरीस मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पुरामुळे वाहून गेलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, सोलर पंप, ठिबक सिंचन व्यवस्था, कांदा चाळी, पाईपलाईन आदी घटकांना मदत व पुनर्वसन कायद्यात समाविष्ट करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरामुळे व्यापाऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना देखील आधार देण्यात यावा, अशी मागणी आमदार धस यांनी केली. त्याचबरोबर आष्टी मतदारसंघातील सुमारे ३०० ट्रान्सफॉर्मर्स वाहून गेल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाला असून, हे ट्रान्सफॉर्मर्स तातडीने बसवावेत जेणेकरून आगामी पेरणीसाठी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत होईल,या बाबीकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.केवळ दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही, तर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी तातडीचे व ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री महोदयांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.



