रेल्वे स्टेशन चौकात नगरसेवक सुयोग खाडे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन; नागरिकांसाठी दिलासा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : स्थानिक रेल्वे स्टेशन चौक परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन आमदार गजानन लवटे व वार्ड क्रमांक २ चे नगरसेवक सुयोग खाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर प्रवासी, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना नगरसेवक सुयोग खाडे यांनी, “उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही खरी समाजसेवा आहे,” असे सांगितले.
सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघात व निर्जलीकरणाच्या समस्या वाढत असून अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेली पाणपोई नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. पाणपोई ही केवळ पाण्याची सुविधा नसून समाजसेवा, परोपकार आणि माणुसकीचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रशांत ठाकरे, गजानन लेंढे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अशोक पिंजरकर, सचिन अब्रुक, डॉ. कुकडे, अनंत मानकर, प्रशांत गोंडचवर, राहुल मोपारी, प्रशांत अकर्ते, अशोक बहिरे, विनोद चोपडे, मसाळ सर, सतीश हरणे, विनोद पारडे, धरमठोक, खंडारे, मुश्ताक, सतीश कोल्हे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



