बीड

केज पोलिसांची कारवाई: गोवंश जनावरांचे अवशेष वाहून नेणारा टेम्पो पकडला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज पोलिसांची कारवाई: गोवंश जनावरांचे अवशेष वाहून नेणारा टेम्पो पकडला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
केज / प्रतिनिधी:-केज पोलिसांनी गोवंश जनावरांचे हाडांचे सांगाडे, मुंडक्याच्या कवट्या, पायांचे सांगाडे व मांस वाहून नेणाऱ्या आयशर टेम्पोवर मोठी कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पहाटे ६.२५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव शिवार (ता. केज) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८(डी) वर करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन केज यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११२ वर प्राप्त झालेल्या कॉलनुसार घटनास्थळी पोहचून त्यांनी ही कारवाई केली.
सदर टेम्पो (एम.एच.१२ एच.डी ३३४८ – विटकरी रंगाचा आयशर) रस्त्याच्या कडेला उभा असताना पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात गायी, म्हशी व बैल यांचे अवशेष — हाडांचे सांगाडे, मुंडक्या, पायांचे सांगाडे व मांस सुमारे ५ टन वजनाचे सापडले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पाहणीअंती सदर मालाची अंदाजे किंमत २,५०,०००/- रुपये एवढी ठरवण्यात आली. तर टेम्पोची किंमत ५,५०,०००/- रुपये असून, एकूण जप्त मुदत मालाची किंमत ८,००,०००/- रुपये आहे.
सदर प्रकरणात वाहन चालक अकबर इस्माईल टकारी (वय ४५), गाडी मालक अमीर इस्माईल पठाण, माल पुरवठादार तौफिक खुरेशी (ख्वाजा नगर, धाराशिव) आणि माल स्वीकारणारा अतिक (रा. नेकनुर, ता. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पो.ह. सानप (ब.क्र. १०४९), पो.कॉ. गीते (४७१), पो.अं. कागदे (७४), पो.अं. फड (२७४) व पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून दोन नमुने सीलबंद करण्यात आले. उर्वरित मांस व सांगाडे ठिकाणी मोठा खड्डा करून नष्ट करण्यात आले.
या घटनेनंतर प्राण्यांच्या छळास प्रतिबंध करणारा कायदा १९६० चे कलम ११(१)(ए), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(बी) (सी) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कराडकर साहेब  करत आहेत.
Back to top button