
लोकलढा अभ्यास गटाची उजणी धरण, जलसेतू येथे भेट
बीड, प्रतिनिधी :-गेवराई तालुक्यातील लोकलढा आंदोलनातील शेतकरी अभ्यास गटाने उजणी धरण व त्यावरील पाट योजनांना भेट देऊन माहिती घेतली. शेतीसाठी पाण्याचा दुष्काळ दूर करून आपली शेती बारामती पॅटर्न प्रमाणे पाणीदार करण्यासाठी अशा योजना व्हाव्यात यासाठी जनजागृती व शासनाकडे मागणी हा अभ्यासगट करणार आहे.
जायकवाडी धरणाचे पाणी बीड जिल्ह्यातील वंचित भागाला मिळावे, यासाठी लोकलढा आंदोलन गेल्या दीड वर्षापासून सतत संघर्ष करत असून शासनाकडे पाठपुरावाही करत आहे. टेंभूर्णी येथील उजणी धरणामुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. हे धरण व त्यावरील पाट योजनांमुळे लाखो एकरवर ऊस, फळबागा तर आहेतच शिवाय दूध उत्पादन, रेशीम उद्योग व इतर उद्योगांमुळे हा परिसर विकसित झाला आहे. या भागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. लोकलढा आंदोलनात या सर्व योजनांचा उल्लेख अनेकवेळा आपल्याकडील ऊसतोड मजूरांनी केला होता. याच अनुषंगाने लोकलढा आंदोलनाने उजणी धरण व त्यावरील पाट योजनांचा अभ्यास दौरा केला.
या अभ्यास गटामध्ये भाऊसाहेब जरांगे पाटील, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, बालासाहेब शेरकर, वसंत पवळ, जीवन मोघे, गंगाधर चव्हाण, गणेश जाधव यांचा सहभाग होता. या अभ्यास गटाने उजणी धरण, भिमा-निरा संगम, धरणावरील कालवा योजना, ऊस व द्रांक्ष, नारळ, चिकू आदी फळबाग शेती, जर्सी गाय व म्हैस पालन, दूध उत्पादन, संकलन व वितरण, शेती जोडव्यवसाय व शेती पूरक व्यवसाय आदींची पाहणी केली, शिवाय शेतकरी व त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याकडून माहिती घेतली.
उजणी धरण व कृष्णा खोऱ्यातील पाणी बीड जिल्ह्यातील वंचित व दुष्काळी भागाला मिळाले पाहिजे, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बीड जिल्ह्यात पाटपाणी योजना होणे गरजेचे आहे, शेतकरी आत्महत्या थांबून शेतकर्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी व शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासाठी हा अभ्यास दौरा महत्वाचा असल्याचे या लोकलढा आंदोलनाचे समन्वयक राहुल लोंढे म्हणाले.
नेत्रदीपक असा जलसेतू
लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे भिमा व निरा नदीचा संगम आहे. याच संगमावर नदीपासून दीडशे ते दोनशे फूट अंतरावर उंच असा जलसेतू ( पाण्याचा पूल) आहे. बारा फूट रुंद व पंधरा फूट उंच असलेल्या या सेतुमधून उजणीचे पाणी पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्याला जाते. असे विकासाच्या पाया ठरलेल्या व कोट्यवधी रुपये खर्चाच्या योजना बीड जिल्ह्यात कराव्यात अशी मागणी लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे, आप्पासाहेब महानोर, राहुल लोंढे, बालासाहेब शेरकर यांनी केली आहे.


