खर्डा हद्दीत गांजा तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत

खर्डा हद्दीत गांजा तस्करीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत
तरडगांव फाट्यावर एलसीबीची मोठी कारवाई; ९.८५४ किलो गांजा जप्त
जामखेड प्रतिनिधी :अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध कठोर कारवाईचा धडाका सुरू असून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या आहेत. टास्क फोर्स नोडल अधिकारी पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत माहिती संकलन करत मोठी कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराने हिरो सीडी डिलक्स मोटारसायकल (एम.एच.-१६-बी-२५५०) वरून तरडगांव फाट्याहून गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती दिली. यानंतर पो.नि. कबाडी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला कळवून संयुक्त पथकाने तरडगांव फाट्यावर सापळा रचला.बाईक थांबवून झडती घेतली असता आरोपींनी आपली नावे
१) सचिन नवनाथ गायकवाड (वय २५, रा. पिंपरखेड, ता. जामखेड)
२) सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड)
अशी सांगितली. झडतीमध्ये गोणीतील हिरवट पाने, फुले, बोंडे असलेला एकूण ९.८५४ किलो गांजा आढळून आला.आरोपींनी सदर गांजा हा सुभम घुंगरे (रा. माहिजळगांव, ता. कर्जत) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले असून घुंगरे हा फरार आहे.या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून २,४५,४७५ रुपये किमतीचा ९.८५४ किलो गांजा,३०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल,१,००० रुपये रोख रक्कम,७०,००० रुपये किमतीची मोटारसायकल,असा एकूण ३,४६,४७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व खर्डा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे केली आहे. अहिल्यानगर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरुद्ध ‘जीरो टॉलरन्स’ धोरण कायम ठेवण्यात आले आहे.



