सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेणारे अजित दादा…

सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेणारे अजित दादा…
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, सामान्य माणसाला न्याय देणारे आणि कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागणारे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित (दादा) पवार यांचे काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभर हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राला लाभलेले एक कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
अजितदादा हे केवळ मोठे राजकीय नेते नव्हते, तर सामान्य कार्यकर्त्याच्या भावना समजून घेणारे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वाचा अनुभव मलाही एका संस्मरणीय प्रसंगातून अनुभवायला मिळाला.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जामखेड तालुक्यातील एक सामान्य कार्यकर्ता. जामखेड हा दुष्काळी तालुका. थोडीफार बागायती शेती आणि ऊस उत्पादनाचे क्षेत्र असूनही आमच्या तालुक्यात एकही साखर कारखाना नव्हता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वारंवार दुर्लक्षित राहत होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तालुक्यात कारखाना उभा राहावा यासाठी मी प्रयत्न सुरू केले. लायसन्सही मिळवले.
मात्र बीड जिल्ह्यातील एका प्रस्थापित नेत्यांनी साखर आयुक्तांना हाताशी धरून आमच्या तालुक्यात दुसरा प्रस्ताव टाकला आणि माझे लायसन्स रद्द करण्यात आले. मी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले आणि माझ्या बाजूने निकाल लागला.
इतक्यावरही विरोधक थांबले नाहीत. त्यांनी माननीय अजितदादा पवार तसेच दिलीप वळसे पाटील यांच्याकडून फोन लावून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटले, हे ऐकल्यावर दादा मला झापतील… “साखर कारखाना काढणे म्हणजे कोण्या येड्या-गबाळ्याचे काम नाही,” असे म्हणतील.
पण अजितदादांनी तसे केले नाही. त्यांनी मला शांतपणे एकदा भेटण्याचा सल्ला दिला.
अहमदनगर जिल्ह्यात सोनई येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मला सकाळी सात वाजता नगरच्या विश्रामगृहावर बोलावले. मी वेळेत पोहोचलो, मात्र तेथे प्रचंड गर्दी असल्याने संवाद होऊ शकला नाही. त्यांनी मला सोनईला येण्यास सांगितले.
मी सोनईला गेलो. कार्यक्रम संपला, जेवण झाले आणि आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. अजितदादांनी मला गाडीत घेतले. समवेत पालकमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते आणि पी.ए. देशमुख होते.
त्या अर्ध्या तासाच्या प्रवासात मी कारखान्याबाबतची सुरुवातीपासूनची सर्व हकीकत सांगितली. अजितदादांनी अत्यंत शांतपणे, संयमाने माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी माझी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि “मी परत सर्व संबंधितांशी बोलतो,” असे आश्वासन दिले.
नगर कधी आले ते मला कळलेच नाही.
एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची बाजू समजून घेणारा, त्याला वेळ देणारा असा असामान्य नेता महाराष्ट्राला लाभला होता. परंतु नियतीपुढे सर्वच हातबल असतात. आज सदर कारखान्याची केस सुप्रीम कोर्टाच्या बोर्डावर आहे, मात्र अजितदादांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि आपुलकी कायम स्मरणात राहील.
या महान नेत्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
*— सुरेश भोसले*
(जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अहिल्यानगर)



