बीड

“सातबारा कोरा” करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी पाळले नाही : राजेंद्र आमटे

“सातबारा कोरा” करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी पाळले नाही : राजेंद्र आमटे
कर्ज “नवे-जुने” नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; ५० हजार ऐवजी २ लाख अनुदान देण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी):( दि.१० )
विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा “सातबारा कोरा करू” असे आश्वासन दिले होते. मात्र निवडून आल्यानंतर कर्जमाफीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची टीका शेतकरी हक्क मोर्चाचे कार्यकर्ते राजेंद्र आमटे यांनी केली आहे.
शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे आमटे यांनी म्हटले आहे.
नागपूर येथील आंदोलनानंतर अनेक बँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी “कर्ज नवे-जुने” करण्याची मोहीम राबवली. नवे-जुने केले तरी कर्जमाफीचा लाभ मिळेल असे खोटे आश्वासन देऊन अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे ५० हजार रुपयांचे अनुदान अपुरे असल्याचे सांगत ही रक्कम २ लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. ५० हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या व्याजातच संपून जाते, त्यामुळे त्याचा फारसा लाभ होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अनेक बँकांनी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांचे कर्ज नवे-जुने करून घेतले असून ते कर्ज आजही शेतकऱ्यांच्या बोकांडी आहे. त्यामुळे ते कर्जही शासनाने माफ करावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, शेतकरी नेते बाळासाहेब मोरे पाटील, युवा शेतकरी नेते अशोक ढोले पाटील, शेतकरी पुत्र संदीप नवले, खाजा भाई पठाण, नजीब भाई, राजू वीर, अर्जुन सोनवणे आदी उपस्थित होते.
Back to top button