बीड
भोजापूरमध्ये रस्ता बंद करून अतिक्रमणाचा दहशतवाद! उपोषणावर जीव टांगणीला – मनसेचा अल्टिमेटम, “आता नाही तर कधीच नाही!”

भोजापूरमध्ये रस्ता बंद करून अतिक्रमणाचा दहशतवाद! उपोषणावर जीव टांगणीला – मनसेचा अल्टिमेटम, “आता नाही तर कधीच नाही!”
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा:- भोजापूरमध्ये अनधिकृत भिंतीने रस्ता गिळंकृत केल्याने नागरिकांचे आयुष्य ठप्प झाले आहे. बाभूळे दाम्पत्य जीव धोक्यात घालून आमरण उपोषणावर असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रणांगणात उतरली असून परिस्थिती चिघळण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भंडारा शहराला लागूनच असलेला भोजापूर येथे नहर रोडवरील अत्यावश्यक वहिवाटीचा रस्ता एका अनधिकृत भिंतीमुळे पूर्णपणे बंद करण्यात आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर अक्षरशः गदा आली आहे. गोपीचंद वंजारी यांच्या घरापासून वैभवलक्ष्मी नगरकडे जाणारा हा मार्ग बंद झाल्याने परिसरात संतापाचा ज्वालामुखी धगधगत आहे.
या अन्यायाविरोधात अरविंद बाभूळे आणि अश्विनी बाभूळे हे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत असून, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तरीही प्रशासनाची उदासीनता संताप अधिक तीव्र करत आहे.
परिस्थितीचा स्फोटक टप्पा ओळखत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. “रस्ता मोकळा करा, भिंत पाडा – अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन उसळेल,” असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे यांनी दिला.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता प्रशासनावर जबरदस्त दबाव निर्माण झाला असून, पुढील काही तासांत निर्णय झाला नाही तर भोजापूरमध्ये आंदोलनाचा ज्वालामुखी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भिंत उभी आहे…
न्याय मात्र अजूनही कोसळलेलाच!
आता पाहायचं – प्रशासन भिंत पाडणार की जनतेचा संताप सगळंच उध्वस्त करणार?



