बीड

गेवराई तहसीलमध्ये एसडीएम मॅडमची अचानक भेट; राक्षसभुवन वाळू उपसा प्रकरणाच्या चर्चांना उधाण

गेवराई तहसीलमध्ये एसडीएम मॅडमची अचानक भेट; राक्षसभुवन वाळू उपसा प्रकरणाच्या चर्चांना उधाण
गेवराई | अंकुश आतकरे
राक्षसभुवन येथील घरकुल योजनेच्या नावाखाली झालेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी गेवराई तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांच्या अचानक भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
               प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसडीएम मॅडम तहसील कार्यालयात आल्यानंतर सुरुवातीला काही काळ वाहनातच थांबल्या. त्यानंतर त्या वाहनाबाहेर येऊन तहसील कार्यालयाच्या आवारात काही वेळ उभ्या राहिल्या. दरम्यान, तहसीलदारांच्या केबिनला बाहेरून कुलूप असल्याचे दिसून आले. तहसीलदार कार्यालयात नसून कार्यालयाबाहेर वाहनात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. काही वेळ तहसील परिसरात थांबल्यानंतर एसडीएम मॅडम परत निघून गेल्या. मात्र त्यांच्या भेटीचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. या भेटीचा संबंध राक्षसभुवन येथील कथित अवैध वाळू उपसा प्रकरणाशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सदर प्रकरणात काही शासकीय अधिकारी तसेच खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी आणि संभाव्य कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राक्षसभुवन येथील तलाठी यांनी चर्चेदरम्यान आपल्याला काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी आमदार विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित अवैध वाळू उपसा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच संबंधित परिसराची ड्रोनद्वारे पाहणी केली असून वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांचे मोजमापही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, कारवाईची दिशा काय राहते आणि यामध्ये नेमके कोण अडकणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Back to top button