एअरटेल ओएफसी खोदकामाविरोधात प्रकाश वडमारे यांची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

वारंवार तक्रारी करूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याचा आरोप;
अपघातानंतर चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी): शहरातील जालना रोड, गया नगर परिसरात एअरटेल ऑप्टिकल फायबर केबल (जऋउ) टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार प्रकाश मारुती वडमारे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे केली आहे.
वडमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जऋउ केबल टाकण्यासाठी रस्त्यावर करण्यात आलेल्या खोदकामाच्या ठिकाणी योग्य ती बॅरिकेडिंग, सुरक्षा फलक, रिफ्लेक्टर आणि रात्रीची प्रकाशव्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत त्यांनी प्रशासनाकडे यापूर्वीही वारंवार तक्रारी व स्मरणपत्रे दिली होती.
मात्र, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याचा आरोप करत दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता जालना रोड परिसरातून जात असताना जऋउ खोदकामामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून उपचार सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
अपघातानंतर दि. 26 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कंपनी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे स्वतंत्र तक्रार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीड शहरातील धोकादायक जऋउ खोदकामांची तातडीने पाहणी करावी, संबंधित कामासाठी आवश्यक परवानग्या व सुरक्षा नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही याची तपासणी करावी, तसेच दोषी आढळणार्या कंपनी, कंत्राटदार अथवा संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश वडमारे यांनी केली आहे.
तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत धोकादायक ठिकाणचे जऋउ खोदकाम तात्पुरते बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता या तक्रारीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे….


