बीड

शिवसेनेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार जुन्या-नव्या शिवसैनिकांची मोट बांधणार-जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांचा निर्धार

शिवसेनेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार जुन्या-नव्या शिवसैनिकांची मोट बांधणार-जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांचा निर्धार
बीड, दि.१८ (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुखांवर नितांत श्रद्धा आणि त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिक आजही प्रत्येक गावात आणि घराघरात आहे. बीड जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही. वीस वर्षापासून एकही आमदार आणि खासदार पक्षाचा नसतानाही आणि अनेकांनी गद्दारी करूनही शिवसैनिक मात्र आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी बांधील आहे. आगामी काळात जुन्या आणि नव्या शिवसैनिकांची मोट बांधून पक्षाला उभारी देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे. शिवसेनेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे असा निर्धार नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी व्यक्त केला.
उल्हास गिराम यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. उल्हास गिराम यांनी आतापर्यंत पक्षाचे काम एकनिष्ठतेने केले आहे. ठिकठिकाणी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले जात आहे. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. उल्हास गिराम म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी आहे. आजही बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात निष्ठावंत शिवसैनिक आहेत. गेल्यास वीस वर्षापासून शिवसेनेचा आमदार किंवा खासदार नसतानाही आणि अनेकांनी पदे मिळवून गद्दारी केलेली असतानाही बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्या ताकदीला एकत्र करण्याचे काम आमचे आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांची मोट बांधून नव्या उमेदीने कामाला लागायचे आहे. बीड  जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात निर्माण करायचा आहे असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Back to top button