अहमदनगर

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

जामखेड : शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व जामखेड तालुका मल्लखांब असोसिएशन, श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.

या प्रसंगी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक, पंच कमिटी, तसेच अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय भाऊराव वीर, उद्योजक संतोष फिरोदिया, विश्व हिंदु परिषदेचे केंद्रिय मंत्री तथा उद्योजक विवेक कुलकर्णी, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, उपाध्यक्ष नंदेश शिंदे, खजिनदार होनाजी गोडळकर, सतीश दारकुंडे सर, निलेश कुलकर्णी, अमित जिनसीवाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत, अहिल्यानगर, जामखेडसह जवळपास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून तब्बल ५५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशस्त बैठक व्यवस्था, चहापान, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, तसेच जामखेड नगरपरिषदेमार्फत फिरते सुलभ शौचालय यांसह सर्व इतर सुखसुविधा उत्कृष्ट पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत शंभूसूर्य मर्दानी खेळ व जामखेड तालुका मल्लखांब असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. यामध्ये मुलांच्या १४ वर्षांखालील गटात संस्थेचा कृष्णा अशोक जगताप प्रथम तर समर्थ विनोद वाघ याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. मुलींच्या १४ वर्षांखालील गटात संस्थेची धनश्री राजेंद्र टेकाळे हिने प्रथम तर प्रज्ञा विवेक कुलकर्णी हिने चतुर्थ क्रमांक पटकाविला. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात संस्थेचा राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू कृष्णा सचिन जगदाळे प्रथम, प्रशांत कोंडीराम भापकर द्वितीय, तर समर्थ बाबासाहेब जगताप याने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात संस्थेचा राज्यस्तरीय मल्लखांब खेळाडू रितेश संतोष खुपसे याने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी, जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राध्यापक संजय गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, सहप्रशिक्षक अमोल निमोणकर, सहप्रशिक्षक रोनित खुपसे यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री शंभूसुर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र भांबे, संजय वारे, तुकाराम वारे, आकाश टेकाळे, अमन भैसडे, किरण राऊत, शत्रुघ्न जरे यांसह सर्व कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले.

Back to top button