बीड

आष्टीत चोरट्यांचा थरार! जिल्हा परिषद शिक्षिकेला धावत्या गाडीवरून गाठलं; ‘धूम स्टाईल’ने सोन्याचे दागिने लंपास

आष्टीत चोरट्यांचा थरार! जिल्हा परिषद शिक्षिकेला धावत्या गाडीवरून गाठलं; ‘धूम स्टाईल’ने सोन्याचे दागिने लंपास
आष्टी (प्रतिनिधी):
आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, भरदिवसा ‘धूम स्टाईल’ने चोऱ्या करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास आष्टी-मांडवा रस्त्यावर एका जिल्हा परिषद शिक्षिका लटपटे यांना लक्ष करत अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्या आष्टीहून मांडवा गावाकडे आपल्या दुचाकीवरून शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास आष्टी-मांडवा रस्त्यावरून जात असताना, पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीला गाठले. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी चालू गाडीवरूनच शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ‘धूम स्टाईल’ने हिसकावून घेतले आणि अत्यंत वेगाने मांडवा रस्त्याच्या दिशेने पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षिका अत्यंत घाबरून गेल्या. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भरसकाळी आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी चोरीमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून, पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित मार्गांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या ‘धूम स्टाईल’ चोरीच्या प्रकारामुळे शिक्षिका वर्ग आणि महिलांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, पोलिसांनी अशा अट्टल चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Back to top button