बीड

विधिमंडळात आमदार रोहित पवारांचा ; कर्जत-जामखेडच्या प्रश्नांवर हल्लाबोल…!

विधिमंडळात आमदार रोहित पवारांचा ; कर्जत-जामखेडच्या प्रश्नांवर हल्लाबोल…!

विकासाला गती देण्यासाठी आमदार रोहित पवारांचे विधानसभेत ठोस पाऊल

कर्जत/ जामखेड दि. ७ (प्रतिनिधी) :कर्जत-जामखेड मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांसह राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार रोहित पवार यांनी आज विधिमंडळात बोलताना ठाम भूमिका मांडली. पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना त्यांनी मतदारसंघाच्या सुरक्षेपासून ते पोलिसांच्या अडचणींपर्यंत अनेक विषयांवर सरकारला जाब विचारला.

पवार यांनी कर्जत आणि जामखेड शहरांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच, एसआरपीएफ केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तातडीने अर्थसहाय्य देण्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खर्डा आणि मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतीसाठी देखील निधीची गरज त्यांनी सांगितले.

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीमधील गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून, नागरिकांना तातडीने परतावा मिळावा यासाठी त्यांनी जोरदार आवाज उठवला. पोलिस दलाच्या गृहकर्ज योजना, पदोन्नती प्रक्रिया, बदली व पोलिस भरतीतील अडथळ्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशीही ठाम मागणी पवार यांनी सभागृहात केली.

कर्जत-जामखेड मधील एमआयडीसी प्रकल्प राजकारणात अडकला असून, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पवार म्हणाले.

राज्यस्तरीय मुद्द्यांवर बोलताना त्यांनी उद्योगांसाठी वीज दर महाग असल्याने स्पर्धा टिकवणे कठीण जात असल्याचे नमूद केले. हिंजवडी आयटी पार्कमधील खराब रस्त्यांची दुरवस्था आणि सौर प्रकल्पांसाठी घेतलेल्या पैशांनंतरही न मिळणारे सोलर कनेक्शन यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नैसर्गिक आपत्तींमध्ये कोसळलेले विजेचे खांब शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असून, अशा परिस्थितीत योग्य आणि स्पष्ट नियमावली तयार करून उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचक मागणीही त्यांनी केली.

एकूणच स्थानिक ते राज्यस्तरीय प्रश्नांवर रोहित पवार यांनी ठाम आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले असून, त्यांच्या या मागण्यांमुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या समस्या सोडविण्यास गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Back to top button