📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मनसेचा कोकणात ‘राज’की धडाका; निष्ठावंत शिलेदार मृदास भाई तोंडलेकर यांच्याकडे श्रीवर्धन तालुक्याची सूत्रे!

मनसेचा कोकणात ‘राज’की धडाका; निष्ठावंत शिलेदार मृदास भाई तोंडलेकर यांच्याकडे श्रीवर्धन तालुक्याची सूत्रे!
​२००६ पासूनची अविश्रांत सेवा आणि निष्ठेला फळ; राजसाहेबांच्या हस्ते ‘शिवतीर्था’वर नियुक्ती पत्राचे वाटप
​श्रीवर्धन (संदेश घोलप):
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये मोठी खांदेपालट केली असून, पक्षाची स्थापना झाल्यापासून एकनिष्ठ राहिलेले वेळास आगरचे सुपूत्र श्री. मृदास (भाई) काशिनाथ तोंडलेकर यांची श्रीवर्धन तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण दक्षिण रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​मृदास भाई तोंडलेकर हे नाव श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात नवीन नाही. २००६ मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हापासून मृदास भाई ‘महाराष्ट्र सैनिक’ म्हणून अहोरात्र काम करत आहेत. पक्षाची कोणतीही सभा असो, आंदोलने असोत किंवा राजकीय बैठका, मृदास भाईंनी नेहमीच ‘मुंबई ते श्रीवर्धन’ असा प्रवास करत पक्षाचा झेंडा बुलंद ठेवला आहे. त्यांच्या याच २० वर्षांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर हा मोठा विश्वास टाकला आहे.
​वेळास आगर येथील भंडारी समाजाचे सक्रिय नेतृत्व करणारे मृदास भाई तोंडलेकर यांची नियुक्ती समाजासाठी गौरवास्पद मानली जात आहे. केवळ राजकीय बैठकांपुरते मर्यादित न राहता, त्यांनी स्थानिक विकासकामे, युवकांचे प्रश्न आणि सामाजिक उपक्रमांत नेहमीच हिरीरीने सहभाग घेतला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील भंडारी समाज आणि बहुजन समाजातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मनसेकडे आकर्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
​याच सोहळ्यात श्री. राज गणपत पार्टे यांची दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज पार्टे यांचा जिल्हास्तरावरील अनुभव आणि मृदास भाईंची तालुका स्तरावरील पकड यामुळे श्रीवर्धनमध्ये मनसे आता ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “राजसाहेबांचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही तालुक्यात मनसेची ताकद दुप्पट करू,” असा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
​”पक्षाची ताकद वाढवणे हेच ध्येय” – मृदास भाई तोंडलेकर
​नियुक्तीनंतर आपले विचार मांडताना मृदास भाई म्हणाले, “आजवरचा माझा २० वर्षांचा अनुभव आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी पूर्णपणे न्याय देईन. राजसाहेबांचे विचार आणि ध्येयधोरणे तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी मी आणि माझे सहकारी कटिबद्ध आहोत. श्रीवर्धन तालुक्यात मनसेला क्रमांक १ चा पक्ष बनवणे हेच माझे आता प्रमुख उद्दिष्ट आहे.”
​मृदास भाईंच्या निवडीची बातमी समजताच वेळास आगरसह संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महाराष्ट्र सैनिकांनी जल्लोष केला. श्रीवर्धन तालुका मनसे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Back to top button