जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण काळाची गरज: रणजित राऊत

जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण काळाची गरज: रणजित राऊत
जामखेड: तालुक्यातील फक्राबाद येथील रहिवासी तथा सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राणीशास्त्र विभागातील युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी “जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज असून आपल्या सर्वांची हि सामूहिक जबाबदारी आहे” असे प्रतिपादन केले.
तामिळनाडू मधील कोंगुनाडु कला व विज्ञान महाविद्यालय कोयंबतुर अंतर्गत प्राणीशास्त्र व वन्यजीवशास्त्र विभागाच्या वतीने २२ मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी जैवविविधतेचे मानवी जीवनातील महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
राऊत यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा जैवविविधतेचा अविभाज्य घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक सजीवाची भूमिका महत्त्वाची आहे. वृक्षतोड, वाढते प्रदूषण, नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जैवविविधतेवर मोठा परिणाम होत असून अनेक वनस्पती व प्राणी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जैवविविधतेचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती” या विषयावरही आपले विचार मांडले. स्थानिक स्तरावर वृक्षारोपण, जलसंधारण, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण जनजागृती यांसारख्या उपक्रमांमधून जागतिक पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.मदन शंकर, डॉ.शिवा सूब्रमण्यम, डॉ.आर. मोहन, डॉ.वेंकिटाचलम, डॉ.सेल्वासुंदरम, डॉ.सतीश कुमार, डॉ.यशवंत कुमार, डॉ.येलक्किया, डॉ.बालासुब्रमण्यम, डॉ.राजेश कुमार यांच्यासह संशोधक विद्यार्थी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी जैवविविधता संवर्धनासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



