📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वडशेत-वावे येथील आदिवासी बांधवांची पाणीटंचाई अखेर दूर; सभापती सुचीन किर यांची तात्काळ धाव, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

वडशेत-वावे येथील आदिवासी बांधवांची पाणीटंचाई अखेर दूर; सभापती सुचीन किर यांची तात्काळ धाव, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
श्रीवर्धन (संदेश घोलप)
श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत-वावे परिसरात गेल्या एप्रिल महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. कडक उन्हाळा, पावसाचा लांबलेला आगमन आणि आटलेल्या जलस्रोतांमुळे येथील आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
ही गंभीर परिस्थिती समोर येताच श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सुचीन किर यांनी तातडीने पुढाकार घेत परिस्थितीची पाहणी केली. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोणताही विलंब न करता प्रशासनाला तत्काळ सूचना दिल्या आणि त्याच दिवशी वडशेत-वावे येथे पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.
सभापतींच्या निर्देशानुसार युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. टँकरद्वारे परिसरातील प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून पाण्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ थांबली असून आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलताना सभापती सुचीन किर म्हणाले, “श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षित केली जाणार नाही. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील. पाणीटंचाई असो किंवा इतर कोणतीही अडचण, नागरिकांना वेळीच मदत मिळणे हेच आमचे प्राधान्य आहे.”
सभापतींच्या या तत्पर, संवेदनशील आणि धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे वडशेत-वावे येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. पावसाचे आगमन अद्याप लांबल्याने तालुक्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम असली तरी प्रशासनाने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे वडशेत-वावेतील संकटावर मोठ्या प्रमाणात मात करण्यात यश आले आहे.
सभापती सुचीन किर यांच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे आणि जनहिताच्या भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Back to top button