बीड
कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धन तालुक्याच्या नेतृत्वात नवचैतन्य; सचिवपदी उमेश अडखळे, सहसचिवपदी गजानन निंबरे यांची बिनविरोध निवड

कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धन तालुक्याच्या नेतृत्वात नवचैतन्य; सचिवपदी उमेश अडखळे, सहसचिवपदी गजानन निंबरे यांची बिनविरोध निवड
श्रीवर्धन(संदेश घोलप) : कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धन तालुका (स्थानिक) व मुंबई कमिटीची संयुक्त सभा रविवारी, दि. ३१ मे २०२६ रोजी कुणबी समाज मंदिर येथील ग. स. कातकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुका अध्यक्ष श्री. सिताराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संघटनेच्या सचिवपदी श्री. उमेश अडखळे आणि सहसचिवपदी श्री. गजानन निंबरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील कुणबी समाजाला तरुण, सुशिक्षित, अभ्यासू आणि समाजकार्याची तळमळ असलेले नेतृत्व लाभल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
श्री. उमेश अडखळे हे यापूर्वी तालुका कमिटीचे सहसचिव तसेच गालसुरे विभाग २० कमिटीचे सचिव म्हणून यशस्वीपणे कार्यरत होते. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावत समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तर श्री. गजानन निंबरे यांनी बागमांडले विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडताना युवकांना संघटित करण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये प्रभावी सहभाग नोंदविला आहे.
नव्या नेतृत्वाकडून समाज संघटन अधिक मजबूत होईल, शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, युवकांचे सक्षमीकरण होईल आणि समाजहिताच्या विविध योजनांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
सभेला तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित सचिव श्री. उमेश अडखळे आणि सहसचिव श्री. गजानन निंबरे यांनी, “कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक एकात्मतेसाठी आम्ही कटिबद्ध असून संघटनेच्या माध्यमातून अधिक जोमाने कार्य करू,” अशी ग्वाही दिली.
या निवडीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील कुणबी समाजामध्ये नव्या आशा आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


