बीड

जामखेड-बीड रोडवर अज्ञात चारचाकीची धडक; वृद्ध गंभीर जखमी

जामखेड-बीड रोडवर अज्ञात चारचाकीची धडक; वृद्ध गंभीर जखमी

जामखेड प्रतिनिधी : जामखेड-बीड रोडवर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने ७० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय रघुनाथ परदेशी (वय ७०) हे मोटारसायकल (क्रमांक एम एच -१६ -ए.एल.- ३१८०) वरून जामखेड-बीड रोडवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात क्रेटा चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात परदेशी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी दत्तात्रय परदेशी यांना नागरिकांच्या मदतीने जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी रविंद्र दत्तात्रय परदेशी (रा. मोरे वस्ती, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, खासदार निलेश लंके जामखेड दौऱ्यावर आले असताना त्यांनी समर्थ हॉस्पिटलमध्ये भेट देऊन जखमी दत्तात्रय परदेशी यांची तब्येतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.

Back to top button